पोलीस उदय दिनाच्या निमित्ताने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत पोलीस–जनता नातं अधिक दृढ करणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. दिनांक ०२/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे सेंट पॉल स्कूल तांदुळवाडी फाटा, अकोट तसेच पणज येथील हुसने दलवाई उर्दू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी काटोले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज समजावून सांगितले. कायदा-सुव्यवस्था विभाग, गुप्तचर विभाग, मुद्देमाल कक्ष, शस्त्र साठवणूक तसेच पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारत पोलीस यंत्रणेची जवळून ओळख करून घेतली.

याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३२ नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
दरम्यान, दिनांक ०३/०१/२०२६ रोजी ग्राम उमरा येथील लोकमान्य टिळक विद्यालयात जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्यात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थांविरोधातील लढा याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. तसेच गावातून रॅली काढून ‘मिशन उडान’, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पोस्टरद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
हे सर्व उपक्रम मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोउपनि मिनाक्षी काटोले व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकारी–कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे राबविले.
पोलीस उदय दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेले हे उपक्रम पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वास अधिक मजबूत करणारे ठरले असून नागरिकांमध्ये त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.










