अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अकोल्याच्या राजकारणात चित्र बदललं, पण तणाव कमी झाला नाही. बंडखोर शांत झाले म्हणत असतानाच काही प्रभागांमध्ये अजूनही सत्तासंघर्षाची ठिणगी कायम असून, महापालिका निवडणुकीची खरी लढत आता स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीत रंगत शिगेला पोहोचली असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. बंडखोरीमुळे डोकेदुखी ठरलेल्या अनेक प्रभागांमध्ये नेतृत्वाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून बहुतांश नाराज उमेदवारांनी तलवार म्यान केली आहे. त्यामुळे भाजपसह इतर प्रमुख पक्षांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी काही प्रभागांमध्ये बंडखोरी कायम राहिल्याने लढत अजूनही चुरशीची ठरणार आहे.
अर्ज माघारीच्या आजच्या अंतिम दिवशी माजी महापौरांसह तब्बल १६४ उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी आता अकोला महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी ५५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. माघारीनंतर राजकीय समीकरण स्पष्ट झाले असून बहुतांश प्रभागांमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.
या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र, तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर मैदानात उतरला आहे. शिवसेना ठाकरे गटही स्वबळावर, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आघाडी झाली आहे. उमेदवारांची नावे जाहीर होताच अनेक ठिकाणी इच्छुकांमधील नाराजी उफाळून आली होती.
भाजपने ६२ जागांवर उमेदवार दिले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी १४ जागा सोडल्या. उमेदवारी न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष किंवा अन्य पक्षांतून अर्ज दाखल केले होते. या बंडखोरांना मनवण्यासाठी नेतृत्वाकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. त्यात भाजपच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांच्यासह अनेकांनी माघार घेतली. मात्र माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे व माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे.
एकूण ७७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ५८ अर्ज बाद ठरले, तर ७१९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १६४ जणांनी माघार घेतल्याने आता अंतिम टप्प्यात ५५५ उमेदवार उरले आहेत. माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्याने अकोला महापालिका निवडणूक आता खऱ्या अर्थाने निर्णायक आणि चुरशीची ठरणार आहे.









