अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांनी केले आहे. मात्र, या आवाहनाकडे नागरिक आणि व्यावसायिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातील रॉय रिट्रीट हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मनपाची झोननिहाय पथके सक्रिय
अकोला महानगरपालिका क्षेत्रात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार झोननिहाय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहरातील विविध भागांत तपासणी करण्यात येत आहे.
२२ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्व झोनच्या पथकाने तपासणी केली असता रामदास पेठ येथील रॉय रिट्रीट हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित व्यावसायिकावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा तसेच भूगर्भातील पाण्याचा वापर केवळ गरजेनुसार आणि काटकसरीने करावा. पाण्याची नासाडी टाळून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
पाणीगळती, बोअरवेल आणि आरओ प्लांटवर लक्ष
शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
- शहरात पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटून पाणी वाया जात असल्यास.
- सार्वजनिक किंवा खासगी बांधकामासाठी महानगरपालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर होत असल्यास.
- बोअरवेल किंवा विहिरीतील भूजलाचा उपसा करून पाण्याचा अपव्यय होत असल्यास.
- आरओ प्लांटमध्ये महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास.
अशा प्रकारांची तक्रार किंवा माहिती देण्यासाठी नागरिकांनी ०७२४-२४३४४१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई होणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.






Leave a Comment