अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ : जिल्ह्यात अवैध सावकारीच्या व्यवहारातून शेतजमिनीवरून गंभीर वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. सात लाख रुपयांचे कर्ज दिल्यानंतर शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा, ती अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचा तसेच शेतातील कापूस नेल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची आणि बंदुकीतून गोळी झाडण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक अडचणीमुळे घेतले होते सात लाखांचे कर्ज
प्राथमिकीतील तक्रारीनुसार, हिंगणा तामसवाडी येथील शेतकरी नंदकिशोर शिवचरण भाट यांच्याकडे तीन एकर शेती आहे. पीक खराब झाल्याने आणि आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी २०२३ मध्ये अकोल्यातील निंभोरा येथील पदमा चंद्रकांत गावंडे आणि चंद्रकांत ऊर्फ स्वप्नील केशवराव गावंडे यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. तक्रारदाराच्या आरोपानुसार, दोघांनी तीन टक्के व्याजदराने सात लाख रुपये दिले. संबंधितांकडे सावकारीचा वैध परवाना नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
कर्जाच्या हमीपोटी हिंगणा तामसवाडी येथील गट क्रमांक ९३ आणि ९२ मधील जमीन तात्पुरती तारण म्हणून मागण्यात आली होती. जमीन स्वतःच्याच ताब्यात राहील आणि शेती करता येईल, असे आश्वासन दिल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे. मात्र, नंतर कर्ज व व्याजाची रक्कम लवकर परत करण्यासाठी किंवा जमीन नावावर करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर २०२३ मध्ये जमिनीचे नोंदणीकृत विक्रीखत पदमा गावंडे यांच्या नावावर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जमीन परत मागितल्यावर धमकावल्याचा आरोप
शेतकऱ्याने कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज परत करून जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही शेतजमिनी राजू ज्योतिप्रकाश शर्मा, रा. बिर्ला कॉलनी, जठारपेठ, अकोला यांच्याकडे गहाण ठेवल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. ७ जुलै २०२६ रोजी पैसे परत करून जमीन मागितल्यानंतर शिवीगाळ करून हात-पाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शेतातून तीन क्विंटल कापूस नेल्याची तक्रार
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकरी आपल्या शेतात कापूस वेचण्याचे काम करून घेत असताना राजू शर्मा आणि चंद्रकांत ऊर्फ स्वप्नील गावंडे तेथे आले. त्यांनी शेतावर हक्क सांगत मजुरांना कापूस वेचण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. त्यानंतर मजुरांनी वेचलेला सुमारे तीन क्विंटल कापूस बंसी बोर्डे नावाच्या व्यक्तीच्या वाहनातून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दुसऱ्या दिवशी, १७ ऑक्टोबर रोजी शेतात गेलेल्या तक्रारदारास केशवराव नरहरी गावंडे, चंद्रकांत ऊर्फ स्वप्नील गावंडे आणि राजू शर्मा यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. तसेच बंदुकीतून गोळी झाडण्याची आणि जीवे संपवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
अवैध सावकारीच्या व्यवहाराची चौकशी सुरू असल्याचा दावा
संबंधित व्यक्तींच्या घरावर आणि दुकानावर अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने छापेमारी करण्यात आली होती आणि कथित अवैध सावकारीच्या व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे सांगत शेतकऱ्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.






Leave a Comment