Ads

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

By Nilesh Sir

October 6, 2026 1:57 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे :- पातूर : पातूर तालुक्यातील काही खासगी शाळांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाल्यानंतरही १० ते १५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क मागितले जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी शासनाच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या. या फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश मिळाला, त्यांच्याकडून आता शाळा प्रशासनाकडून १० ते १५ हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क किंवा इतर शुल्काची मागणी केली जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, मागितलेली रक्कम न भरल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाईल अथवा विद्यार्थ्याला शाळेतून काढण्यात येईल, अशा प्रकारच्या धमक्या काही विद्यार्थी आणि पालकांना दिल्या जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबांसमोर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे अतिरिक्त रक्कम आकारण्यासंदर्भात नेमके कोणते नियम आहेत, तसेच संबंधित रक्कम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत शिक्षण विभागाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.

दरम्यान, संबंधित शाळांकडून मागितली जाणारी रक्कम कोणत्या शुल्काच्या स्वरूपात आहे, त्यासाठी अधिकृत पावती दिली जाते का आणि ही शुल्क आकारणी शासनाच्या नियमांनुसार आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी पालकांकडून होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना शुल्कासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

पातूर तालुक्यातील काही खासगी शाळांबाबत करण्यात आलेल्या या आरोपांची शिक्षण विभागाकडून दखल घेतली जाते का आणि संबंधित शाळांवर चौकशी अथवा कारवाई होते का, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. संबंधित शाळांची बाजू किंवा शिक्षण विभागाचे अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यानंतर तेही या प्रकरणात समाविष्ट करण्यात येईल.

Related Article

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

अकोला शहरात पाणीटंचाईचा इशारा; नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी, व्यावसायिक वापरावर निर्बंध

दिग्रस खुर्दमध्ये १२ एकरांतील सोयाबीनची गंजी पेटवली; शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!