Ads

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

By Nilesh Sir

August 28, 2026 7:43 am

Ads

अकोट–हरिसाल मार्गावरील पोपटखेड वनविभागाच्या तपासणी नाक्यावर चारपैकी तब्बल दोन CCTV कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सुरू असलेले कॅमेरेही केवळ कार्यालयाच्या आतील भागावर नजर ठेवत आहेत. मग सातपुड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरून कोण येतंय, कोण जातंय, याची नोंद कोण ठेवणार? गेल्या काही महिन्यांपासून कॅमेरे बंद असतानाही वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? या बंद CCTVमागे नेमकं कारण काय? आता या प्रश्नांची उत्तरं वनविभागाला द्यावीच लागणार आहेत!

अकोट तसेच मध्य प्रदेशला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे अकोट–हरिसाल मार्ग. याच महत्त्वाच्या मार्गावर सातपुड्याचा मुख्य प्रवेश असलेल्या पोपटखेड येथे वनविभागाचा तपासणी नाका आहे. मात्र, या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी असलेली CCTV यंत्रणाच अपुऱ्या अवस्थेत असल्याचे अकोला न्यूज नेटवर्कच्या पाहणीत समोर आले आहे.

पोपटखेड वनविभागाच्या तपासणी नाक्यावर चार CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी केवळ दोनच सुरू असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे सुरू असलेले कॅमेरे कार्यालयाच्या आतील भागावर लक्ष ठेवणारे आहेत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची प्रभावीपणे नोंद ठेवली जात आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्य गेटवरच नजर नाही, मग सुरक्षा कशी?

सातपुड्याच्या अतिसंरक्षित वनक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या मार्गावर असलेल्या तपासणी नाक्यावर CCTV यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवेशद्वाराकडील कॅमेरे बंद असल्याने या मार्गावरून नेमकी कोणाची ये-जा होते, यावर नजर कशी ठेवली जाते? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून CCTV कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर येत आहे. असे असताना संबंधित अधिकाऱ्यांनी हे कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी काय पावले उचलली? दुरुस्तीला एवढा विलंब का? सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या यंत्रणेकडे वनविभागाचे दुर्लक्ष तर होत नाही ना? असे प्रश्न आता नागरिकांकडून विचारले जात आहेत.

रात्रीच्या हालचालींचे काय?

अकोट–हरिसाल हा महत्त्वाचा मार्ग असल्याने रात्रीच्या वेळीही या मार्गावर हालचाली सुरू असतात. त्यामुळे बंद CCTV मुळे रात्रीच्या हालचालींची नोंद राहत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही अवैध हालचाली होत नाहीत ना? अशी शंकाही उपस्थित होत आहे. याबाबत वनविभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून आवश्यक ती चौकशी करणे गरजेचे आहे.

CCTV तातडीने सुरू करण्याची गरज

सातपुड्याच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कागदोपत्री तपासणी करून सुटणार नाही. पोपटखेड तपासणी नाक्यावर सर्व CCTV कॅमेरे तातडीने दुरुस्त करून सुरू करणे, मुख्य प्रवेशद्वारावरील प्रत्येक हालचालीची नोंद ठेवणे आणि CCTV यंत्रणेची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बंद CCTV कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. सातपुड्याचा मुख्य प्रवेशद्वारच जर CCTVच्या नजरेआड असेल, तर ‘अतिसंरक्षित’ वनक्षेत्राच्या सुरक्षेचा दावा नेमका किती सुरक्षित? हा सवाल आता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर द्यायला भाग पाडणारा ठरत आहे.

Related Article

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ आगरमध्ये ग्रामस्थांचा एल्गार; कारभारावर गंभीर सवाल

घरकुल यादीत सरपंच पतीच पात्र? गांधीग्रामात खळबळ; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!