Ads

अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपींकडून ६.०५ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

August 25, 2026 8:06 pm

Ads

अकोट : अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली, २ मोटारसायकल इंजिन, एक चेसीस आणि विविध स्पेअर पार्ट असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोट शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६८४/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदीपेठ येथील शिवराज मोहन हाडोळे यांची एमएच ३० बीएच ७६९९ क्रमांकाची स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल १६ ऑगस्टच्या पहाटे घरासमोरून चोरीला गेली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गजानन प्रभुदास रायबोले (वय २३) आणि अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार (वय ३०), दोघेही रा. इंदिरा नगर, येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशी केली असता आरोपींनी अकोट शहर व परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपींच्या घरांची झडती घेतली असता अकोट शहर पोलीस ठाण्यातील दोन चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित मोटारसायकलींसह एकूण आठ मोटारसायकली, दोन इंजिन, एक चेसीस आणि विविध स्पेअर पार्ट पोलिसांच्या हाती लागले.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये शाईन, हिरो होंडा स्प्लेन्डर प्लस आणि पॅशन प्लस या मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बि. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.ठाणेदार किशोर जुनघरे, गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते तसेच पोहेकॉ नरेंद्र जाधव, रामेश्वर भगत, कपिल राठोड, नितेश सोळंके आणि सुबोध खंडारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर अकोट पोलिसांनी घातलेला हा घाव महत्त्वपूर्ण मानला जात असून, या कारवाईमुळे आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!