ANN अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २५ ऑगस्ट २०२६ स्वप्नील सुरवाडे पातूर : पातूर शहरातील कढोणे वाडी परिसरात भरदिवसा अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन घरांमध्ये धाडसी घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कढोणे वाडीत दोन घरांना चोरट्यांचा निशाणा
मिळालेल्या माहितीनुसार, कढोणे वाडी येथील निलेश बगाडे हे दुपारी सुमारे ३ वाजता शेजारी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडले आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील अंदाजे ७ ते ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात आले.
अवघ्या १५ मिनिटांनी दुसऱ्या घरात चोरी
यानंतर याच परिसरातील मदन जाधव यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुपारी सुमारे ३.१५ वाजता घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील अंदाजे ६ ते ७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख चोरून नेल्याचे समोर आले आहे. एकाच परिसरात अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन घरफोड्या झाल्याने कढोणे वाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस कटरचा वापर; चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय
दोन्ही घरांचे कुलूप तोडण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आल्याने ही चोरी पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी घरांची पाहणी करूनच चोरी केली असावी, असा संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र, चोरीमागील नेमके कारण आणि आरोपी कोण आहेत, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पातूर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे तारासिंग राठोड आणि पठाण मेजर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पंचनामा केला. उपलब्ध पुरावे आणि परिसरातील हालचालींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, भरदिवसा एकाच परिसरातील दोन घरांमध्ये झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






Leave a Comment