श्री गजानन महाराज विहीर, अकोलखेड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाची मंदिराबाहेर उभी केलेली पल्सर मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना 20 ऑगस्ट 2026 रोजी घडली. अकोट ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत चोरीची मोटारसायकल जप्त करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
गावंडगाव बु. येथील गोपाल प्रभाकरराव काळे हे श्री गजानन महाराज विहीर अकोलखेड येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल क्रमांक MH 27 DW 8850, किंमत अंदाजे 60 हजार रुपये, मंदिरासमोरील गेटजवळ उभी केली होती. दर्शन घेतल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी बाहेर आल्यानंतर मोटारसायकल दिसून आली नाही. अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सरमसपुरा परिसरातील गांधीपुल येथे कारवाई केली. यावेळी चोरीची मोटारसायकलसह योगेश शंकर गुजरकर (वय 30, रा. सावरा, ता. अकोट) आणि शरद अशोक सहारे (वय 32, रा. खानापुसवेस, अकोट) यांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष 60 हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान योगेश गुजरकर याने आणखी एका मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याने MH 30 BG 5024, किंमत अंदाजे 40 हजार रुपये, ही मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक अकोट विभाग निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोहेकॉ विठ्ठल चव्हाण, पोहेकॉ गोपाल जाधव, पोहेकॉ शैलेश जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल शुभम लुंगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.






Leave a Comment