अकोट शहरामध्ये ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी श्रावण मास कावड उत्सव समिती, अकोट यांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ७ सप्टेंबर रोजी अकोट शहरात भव्य कावड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी अकोट शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून हजारो शिवभक्त, कावडधारी आणि भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून कावड मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
सध्या अकोट शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कावड उत्सवाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शहरात येणार असल्याने या खड्ड्यांमुळे चालताना अडचणी निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
रस्त्यांवरील घाण आणि कचऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.
मिरवणूक मार्गावरील पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी
कावड उत्सवाच्या मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध असावी आणि पथदिवे सुरळीत सुरू राहतील, याची नगर परिषद प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक व नागरिक सहभागी होणार असवल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकाश व्यवस्था महत्त्वाची असल्याचे समितीने म्हटले आहे.
कावड उत्सव हा अकोट शहराची मोठी सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख आहे. या उत्सवादरम्यान कोणत्याही भाविकाला अथवा नागरिकाला त्रास होऊ नये, यासाठी नगर परिषदेने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती सर्व कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत, अशी नम्र विनंती श्रावण मास कावड उत्सव समिती, अकोट यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या :शहरातील मुख्य रस्ते व मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे.उपमार्गांची आवश्यक दुरुस्ती करणे.शहरातील कचरा तातडीने उचलणे.संपूर्ण अकोट शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवणे.मिरवणूक मार्गावरील पथदिवे सुरू ठेवून पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे.







Leave a Comment