अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 9 ऑगस्ट |अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कालबेश्वर निंबी मालोकार परिसरात शेतशिवारात रक्ताच्या थारोळ्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतकाला बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी संशय असून, घटनास्थळी बंदुकीचे राऊंडही आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निंबी मालोकार येथील शेतशिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला असल्याची माहिती जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अधिक तपासणी केली असता मृतकाच्या शरीरावर गोळ्या लागल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मृतदेहाच्या बाजूला बंदुकीचे राऊंडही आढळून आले आहेत.
मृतकाची ओळख पटली
मृतकाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून, त्याची ओळख अमोल गजानन माळोकार, रा. निंबी मालोकार अशी झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीजन्य माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
हत्या कोणी आणि का केली?
अमोल माळोकार यांच्यावर गोळीबार नेमका कोणी केला? या हत्येमागे कोणते कारण आहे? हत्या पूर्वनियोजित होती का? तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व दिशांनी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
घटनास्थळी आढळून आलेले बंदुकीचे राऊंड आणि इतर पुरावे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि हत्येमागील कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






Leave a Comment