अकोट | प्रतिनिधी :-अकोट शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला गंभीर प्रश्न दिवसेंदिवस अधिकच विकोपाला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर तसेच गर्दीच्या भागात उघड्यावर खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसते. अनेक ठिकाणी समोसे, भजी, वडा, कचोरी, पाणीपुरी आणि इतर खाद्यपदार्थ धूळ, धूर, माशा आणि अस्वच्छ वातावरणात तयार करून विकले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अन्न व औषध प्रशासन अकोला विभागाकडून नियमित तपासणी होते का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरातील काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे वारंवार त्याच तळण तेलाचा वापर होत असल्याचे दिसून येते. तेलाचा रंग काळपट झाल्यानंतरही त्याच तेलात खाद्यपदार्थ तळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारच्या तेलाच्या सततच्या वापरामुळे अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ झाकून ठेवले जात नाहीत. धूळ, माशा आणि प्रदूषणाच्या संपर्कात आलेले पदार्थ ग्राहकांना दिले जात असल्याचे चित्र आहे. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहक दररोज हे पदार्थ खात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
नागरिकांच्या मते, अन्न व औषध प्रशासनाने शहरात नियमित धाडी, खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करणे, तळण तेलाची गुणवत्ता तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र अशी कारवाई सातत्याने होताना दिसत नसल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

अन्न विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाने स्वच्छता राखणे, सुरक्षित अन्न विकणे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड न करणे ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे संबंधित प्रशासनानेही नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्यासच नागरिकांचा विश्वास वाढेल.
अकोट शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, अस्वच्छ परिसर आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या तळण तेलाबाबत नागरिकांकडून तक्रारी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन आता प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नियम पाळणाऱ्यांना संरक्षण आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई. होणार का.याकडे आता सर्वांचे लक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे. अकोटमध्ये व्यापक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, की सर्व काही जैसे थे राहील? याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे.







Leave a Comment