आकोट शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज (संध्याकाळी) एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळताच वीर एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने मृतदेह आकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आकोट शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आकोट शहर पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वीही आकोट बस स्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. अल्पावधीतच अशा स्वरूपाच्या घटना समोर आल्याने शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा त्याची ओळख पटत असल्यास तातडीने आकोट शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, जेणेकरून संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचवता येईल.
अनोळखी मृतदेह आढळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






Leave a Comment