Ads

बुलढाण्यात ATS ची धडक कारवाई! पिस्तूलांसह 92 जिवंत काडतुसे जप्त;

By Nilesh Sir

May 19, 2026 12:01 pm

Ads

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका अचानक खडबडून जागा झाला, जेव्हा नागपूर ATS आणि अकोला ATS ने संयुक्त गुप्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा उघड केला. अंत्रीकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या थरारक कारवाईत दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार मॅगझिन, तब्बल 92 जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ATS आणि अकोला ATS यांना संशयित आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ATS पथकाने चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी गावखेडा परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

या ऑपरेशनदरम्यान शुभम सागर पवार (रा. वर्धा) आणि रोहित शिंदे यांच्यासह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एका आरोपीला रात्री अटक करण्यात आली, तर उर्वरित दोघांना सकाळी पकडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार मॅगझिन, 92 जिवंत काडतुसे, एक धारदार चाकू आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा नेमका कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आला होता? आरोपींचे आणखी कोणाशी संबंध आहेत का? याचा तपास आता ATS आणि स्थानिक पोलिसांकडून विविध अंगांनी केला जात आहे.

या प्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या मोठ्या कारवाईमुळे भविष्यात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!