Ads

अकोल्यात कबुतराच्या वादातून रक्तरंजित हल्ला! कोयत्याने वार करत पत्नी-मुलालाही मारहाण

By Nilesh Sir

May 18, 2026 11:19 am

Ads

अकोला शहरातील खदान परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कबुतराच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. एवढेच नव्हे तर पीडिताच्या पत्नी व मुलालाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलमा बी शेख अफसर (वय 40, रा. मदिना मशीदजवळ, झिराबावडी, खदान) या आपल्या पती शेख अफसर शेख अफजल आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. परिसरातील रहिवासी मोहम्मद उजेबोद्दीन उर्फ रेहान मोहसिनोद्दीन याच्याशी त्यांची ओळख होती.

10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी रेहान याने फिर्यादीचा मुलगा शेख शेहामद याला फोन करून “तुझा भाऊ शेहेजाद माझ्याशी भांडण करीत आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर शेख शेहामद आणि त्याचे वडील शेख अफसर हे घराबाहेर गेले. काही वेळाने ते परत आल्यानंतर इस्लाम चौक परिसरात कबुतराच्या कारणावरून वाद झाल्याचे आणि आरोपी रेहान याने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.

घरासमोर पुन्हा उफाळला वाद

यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 मे रोजी फिर्यादीच्या घरासमोर पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपी मोहम्मद उजेबोद्दीन उर्फ रेहान मोहसिनोद्दीन, मोहम्मद शोएब मोहम्मद युनुस आणि मोहसिनोद्दीन रम्मू डॉन हे तिघे मिळून शेख अफसर यांच्याशी शिवीगाळ करत भांडण करू लागले.

वाद वाढताच आरोपींनी शेख अफसर यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, आरोपी रेहान याने कमरेतून कोयता काढून शेख अफसर यांच्या उजव्या हातावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताच्या कोपराजवळ गंभीर दुखापत झाली.

पत्नी आणि मुलालाही मारहाण

पतीला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सलमा बी यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित फयाजउद्दीन नजमोद्दीन आणि मोहसिनोद्दीन जमिरोद्दीन यांनी हस्तक्षेप करत जखमींना आरोपींच्या तावडीतून सोडविले.

यानंतर जखमी शेख अफसर यांना तातडीने पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

या प्रकरणी खदान पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, किरकोळ कारणावरून शहरात वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!