Ads

गुटखा तस्करीचा महामार्ग बनतोय समृद्धी? १.३१ कोटींच्या गुटखा साठा जप्त

By Nilesh Sir

May 10, 2026 7:48 pm

Ads

समृद्धी महामार्गावरून राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) टोल नाका परिसरात महामार्ग पोलिसांकडून नियमित वाहन तपासणी सुरू होती. यावेळी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार आणि पोलीस अंमलदारांनी संशयित ट्रक क्रमांक एमएच ४० सीटी २९६४ थांबवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान ट्रकमधून येणाऱ्या गोडसर वासामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. चालकाकडे सखोल चौकशी करण्यात आली असता वाहनात तंबाखूजन्य पदार्थ असल्याची कबुली त्याने दिली. हा माल अमरावती येथील जावेद नावाच्या व्यक्तीचा असल्याचेही चालकाने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर पोलिस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार यांनी तत्काळ ही माहिती महामार्ग पोलीस विभाग वाशीमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ट्रक कारंजा शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करून तपासणी करण्यात आली असता वाहनातील माल हा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कारंजा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही कोट्यवधी रुपयांचा माल महामार्गावरून सहजपणे वाहतूक होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्ग आता गुटखा तस्करांसाठी सुरक्षित मार्ग बनत आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले आणि पोलीस कॉन्स्टेबल आनंद काकडे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!