अकोट तालुक्यात अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत हातभट्टी आणि देशी दारू विक्री करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १,१७,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. १५ एप्रिल २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकले. ग्राम पोपटखेड येथे सुरू असलेल्या हातभट्टीवर कारवाई करून ९५,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्राम महागाव येथेही हातभट्टीवर कारवाई करत १०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय ग्राम वडाळी देशमुख, लोहारी आणि उमरा येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून अनुक्रमे ४,३००, २,१०० आणि ५,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या सर्व प्रकरणांमध्ये एकूण ५ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.







Leave a Comment