अकोट तालुक्यात दहीहंडा पोलीस ठाण्यात अवैध गुटखा व्यवसाय पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम गुटखा विक्री आणि साठवण सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात स्थानिक नागरिकांना सर्व माहिती असताना देखील पोलिस प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “दिन्या” नावाचा एक व्यक्ती अकोल्यापासून सुमारे 30 किमी अंतरावर येऊन खुलेआम गुटखा विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने पोलिसांना अक्षरशः “चांगलीच बॅटिंग” दिल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. एवढेच नाही तर, अनेक दिवसांपासून तो सक्रिय असतानाही पोलिसांना त्याला पकडण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या खबऱ्या यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याच दरम्यान, “श्याम” नावाचा आणखी एक व्यक्ती समोर आला असून, तो तेल्हारा तालुक्यातून चोहोट्टा बाजार मार्गे मोठ्या प्रमाणात गुटखा अकोट तालुक्यात आणत असल्याचा आरोप आहे. विशेषतः रेल परिसरात अवैधरित्या गुटख्याचा साठा जमा करून तो पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत असल्याची माहिती मिळत आहे. या साठ्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर केला जात असल्याचेही समजते.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक आणि वितरण होत असताना देखील पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गावागावात हा गुटखा पोहोचत असताना सर्वसामान्यांना याची कल्पना आहे, पण पोलिसांना मात्र माहिती नाही का? हा प्रश्न आता थेट प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवणारा ठरत आहे.
एकीकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्रीचा सुळसुळाट सुरूच आहे. यामुळे या मोहिमेची अंमलबजावणी खरंच प्रभावी आहे का, की केवळ कागदोपत्री मर्यादित आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवैध गुटखा विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून, याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून समाजाच्या भवितव्याशी निगडित गंभीर विषय ठरत आहे.
दरम्यान, जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः, एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या अवैध व्यवसायामागे कोणाचे पाठबळ आहे, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे.
पोलिस प्रशासन आता जागे होणार का, की गुटखा माफियांचा खेळ असाच सुरू राहणार?
हा प्रश्न आता अकोट तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे.







Leave a Comment