खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या संभाव्य टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी इंधनाचा काळाबाजारही वाढल्याचे चित्र समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत मोठी कारवाई करत अवैध डिझेल साठ्यावर छापा टाकला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरगाव परिसरातील कोळंबी येथे ही धडक कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे तहसील कार्यालयाच्या निरीक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोहम्मद शेख इब्राहिम (वय २५ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांना आरोपीकडून कोणतीही वैध परवानगी नसताना साठवून ठेवलेले तब्बल ७५० लिटर डिझेल आढळून आले. या डिझेलची किंमत अंदाजे ६७ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ७ रिकामे प्लास्टिक टँकही जप्त करण्यात आले असून एकूण सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ आणि ७ नुसार बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अकोला पोलिसांची ही कारवाई इंधन काळाबाजार रोखण्यासाठी महत्त्वाची मानली जात असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.







Leave a Comment