Ads

---

रस्ता नाही… म्हणून डोलीचाच आधार! शहापूर तालुक्यातील धक्कादायक वास्तव समोर

By Nilesh Sir

April 3, 2026 12:49 pm

Ads

शहापूर तालुक्यातील वरसवाडी गावात मूलभूत सुविधांचा अभाव किती गंभीर आहे, याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र समोर आले आहे. रस्त्याअभावी आजारी महिलेला डोलीतून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदा श्रवण आघाण या महिलेला अचानक प्रकृती बिघडल्याने त्या बेशुद्ध पडल्या. परिस्थिती गंभीर होताच ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र गावात योग्य रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही.

या बिकट परिस्थितीत ग्रामस्थांनी हार न मानता, अत्यंत खडतर आणि दुर्गम मार्गातून डोलीच्या साहाय्याने महिलेला उचलून नेण्याचा निर्णय घेतला. अनेक किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी महिलेला इगतपुरी तालुक्यातील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था समोर आली आहे. “विकासाच्या गप्पा एकीकडे आणि रस्त्याविना जगणं दुसरीकडे” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देत वरसवाडी गावासाठी कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात अशा आणखी जीवघेण्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!