Ads

अकोल्यात मोठा दरोडा टळला! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; शस्त्रसज्ज टोळीतील तिघे जेरबंद

By Nilesh Sir

March 16, 2026 9:27 am

Ads

अकोला शहरात घडू शकणारा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) सतर्क कारवाईमुळे टळला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशिम बायपास परिसरात छापा टाकत दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील तिघांना अटक केली असून दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निहाल अहमद फिरोज अहमद (वय २६, अमरावती), सैय्यद अली सैय्यद अनिस (वय २२, शेगाव) आणि शेख इलीयास शेख अयाज (वय २५, अकोला) यांचा समावेश आहे. तर जुनेद (पूर्ण नाव अज्ञात) आणि आणखी एक आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

१४ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, वाशिम बायपासजवळील अंबिका नगर रस्त्यावर काही संशयित आरोपी कारची नंबर प्लेट बदलून संशयास्पद हालचाली करत आहेत. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने सापळा रचत कारवाई केली.

पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, चाकू, लोखंडी आरी, मास्क, हँडग्लोज, तीन मोबाईल फोन, खोट्या नंबर प्लेट्स आणि एक कार असा १० लाख ५९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. १९ ऑगस्ट २०२५ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एका व्यापाऱ्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणातही ही टोळी सहभागी होती. त्या वेळी राजस्थानमधील कोटा येथे पोलिसांनी त्यांना पकडून व्यापाऱ्याची सुटका केली होती.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ आणि ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अकोला शहरात मोठा गुन्हा घडण्यापासून वाचल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!