अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी अकोट तालुक्यात सध्या एक गंभीर समस्या डोके वर काढताना दिसत आहे. १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास कायद्याने स्पष्टपणे बंदी असतानाही शहरात आणि तालुक्यांमध्ये अल्पवयीन मुलांकडून सर्रासपणे दुचाकी आणि इतर वाहने चालवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय परिसर, बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांवर अल्पवयीन मुलांकडून वेगाने वाहने चालवली जात असून त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वाहतूक नियमांनुसार वाहन चालविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यापूर्वी वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. मात्र प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी घेऊन येताना दिसतात. काही वेळा तर तीन-चार विद्यार्थी एका दुचाकीवर बसून वेगाने वाहने चालवत असल्याचेही चित्र दिसून येते.
या प्रकारामुळे केवळ त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांच्याही जीवितास धोका निर्माण होतो. वेगाने आणि बेफिकीरपणे वाहने चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा अशा प्रकारच्या अपघातांत गंभीर जखमी होण्याच्या किंवा मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत.
याच संदर्भात काही काळापूर्वी तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा-माळेगाव रोडवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. या मार्गावर तीन अल्पवयीन मुलांचा मोटरसायकल अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या दुर्घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क होईल आणि अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र काही दिवस उलटताच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून येत आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे केवळ वाहन चालवणाऱ्या मुलावरच नव्हे तर त्याच्या पालकांवर किंवा वाहन मालकावरही कारवाई करण्याची तरतूद आहे. अल्पवयीन मुलाला वाहन देणे हीदेखील गंभीर चूक मानली जाते. तरीदेखील अनेक पालक स्वतःच्या मुलांना बाईक किंवा स्कूटर देत असल्याचे दिसून येते.
अनेक पालक आपल्या मुलांना महाविद्यालयात जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी दुचाकी देतात. काही वेळा मुलांच्या हट्टापायीही पालक वाहने देतात. मात्र यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो याकडे दुर्लक्ष केले जाते. वाहन चालविण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने अल्पवयीन मुले अनेकदा वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. हेल्मेट न घालणे, वेगाने वाहन चालवणे, मोबाईल वापरत वाहन चालवणे यासारख्या धोकादायक सवयीही अनेकदा दिसून येतात.
अकोट तालुक्यातील विविध भागांमध्ये वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांची जबाबदारी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याची आहे. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होताना दिसत नाही. काही वेळा वाहतूक तपासणी मोहिमा राबविल्या जातात, परंतु त्या मर्यादित काळापुरत्याच असतात. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन चालक रस्त्यावर दिसू लागतात.
विशेषतः महाविद्यालय परिसरात सकाळ आणि दुपारच्या वेळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दुचाकींवर ये-जा करताना दिसतात. अनेक वेळा या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते. तरीदेखील अशा प्रकारावर प्रभावी नियंत्रण ठेवले जात नसल्याचे दिसून येत आहे.
या परिस्थितीमुळे भविष्यात आणखी मोठ्या अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेल्हारा येथील अपघातासारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अल्पवयीन चालकांवर कारवाई करणे, पालकांना जागरूक करणे आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचेही सांगितले जात आहे.
कायदा इतका कडक असताना अकोला जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही? प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, की अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करून हा धोका रोखणार आहे? हा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.









