अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात घडलेल्या भीषण आणि तितक्याच हृदयद्रावक वाहन अपघातात बुलढाणा शहरातील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती बुलढाण्यात पोहोचताच विशेषतः मुस्लिम बहुल जोहर नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती–अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरम गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा विचित्र अपघात घडला. अनीसोद्दीन रफीयोद्दीन काझी (वय ४०) व रेहान नाजिम पठाण (वय २२) अशी मृतांची नावे असून दोघेही बुलढाणा शहरातील जोहर नगर परिसरातील रहिवासी होते.

हे दोघे नागपूरहून लोखंडी पाईप भरून आयशर ट्रकने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. दरम्यान, कुरम गावाजवळ त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगात वाहन रस्त्याच्या बाजूच्या उतारातील खोल खड्ड्यात जाऊन आदळले. अपघाताच्या धडकेत वाहनातील जड लोखंडी पाईप पुढे सरकत थेट केबिनवर कोसळले.
या भीषण धडकेत चालक व क्लीनर म्हणून काम करणारे दोन्ही युवक केबिनमध्येच चेपल्या गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. शनिवारी सकाळपासून जेसीबी व इतर यंत्रणांच्या मदतीने लोखंडी पाईप बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, अपघाताची बातमी बुलढाण्यात पोहोचताच इकबाल चौक ते जोहर नगर परिसरात शोककळा पसरली. काझी व पठाण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अवजड मालवाहतुकीदरम्यान आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.









