देशसेवेच्या सर्वोच्च कर्तव्यावर असताना अकोला जिल्ह्याचे सुपुत्र, नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांनी वीरमरण पत्करल्याने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. १२ मराठा लाइट इन्फंट्री या तुकडीत कार्यरत असलेले शहिद वैभव लहाने हे जम्मू–काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये देशसेवेवर तैनात होते.
शहिद जवान वैभव लहाने यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर (ता. अकोट) येथे आणण्यात आल्यानंतर शासकीय व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण असून, हजारो नागरिकांनी वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.
अंत्यविधीप्रसंगी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, १२ मराठा लाइट इन्फंट्रीचे सीएचएम रामेश्वर पाटील, तसेच शहिद वैभव लहाने यांच्या कुटुंबीयांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सैनिकी विभागाकडून शहिद जवानाला मानवंदना देण्यात आली, तर पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
‘भारत माता की जय’, ‘शहिद जवान वैभव लहाने अमर रहे’ अशा घोषणा देत नागरिकांनी अश्रूंनी डोळे भरून वीर जवानाला अखेरचा सलाम केला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सुपुत्राच्या शौर्याची आठवण अकोला जिल्हा कायम जपेल, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.