विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब समोर आली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेगांव डवला येथील शालेय परिसरात बसवण्यात येणाऱ्या नवीन उच्चदाब विद्युत तारा व ट्रान्सफॉर्मरमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने केंद्रप्रमुख (केंद्र समन्वयक), समूह साधन केंद्र आडसुळ यांच्या मार्फत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले आहे. शाळेच्या स्वच्छतागृहाजवळ उच्चदाब क्षमतेच्या विद्युत तारा आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या शाळेत शिकणारे विद्यार्थी अत्यंत कमी वयोगटातील असून, अशा ठिकाणी विद्युत यंत्रणा उभारणे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीच्या म्हणण्यानुसार, विद्युत ट्रान्सफॉर्मर स्वच्छतागृहाजवळ असल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात, खेळताना किंवा दैनंदिन हालचालीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सदर ट्रान्सफॉर्मर तातडीने दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनाही लेखी अर्ज देण्यात आला असून, तरीही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षितता धोक्यात येत असल्याने ही बाब अतिशय गंभीर असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शाळेच्या आवारात उच्चदाब विद्युत यंत्रणा उभारणे योग्य आहे का, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
