अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून, पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवून तब्बल १२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, प्रदेश काँग्रेस कार्यालयाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत माहिती न देता संबंधित नेत्याने थेट भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांतून उघड झाले.
ही बाब समोर येताच काँग्रेस नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या अधिकृत धोरणाविरोधात जाऊन भाजपसोबत आघाडी करणे ही गंभीर चूक असून, हा थेट पक्षशिस्तीचा भंग असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार संबंधित नेत्याला काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर संबंधित नेत्याच्या नेतृत्वाखालील संपूर्ण ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, त्यांच्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांनाही काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, काँग्रेस पक्षाने “शिस्त सर्वात महत्त्वाची” असा स्पष्ट संदेश दिला आहे. स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणांपेक्षा पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक शिस्त महत्त्वाची असल्याचे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.