अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येने निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाला अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर अंतिम संस्कारासाठी त्यांचे पार्थिव मोहाळा गावाकडे रवाना करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, आंदोलनकर्ते आणि नातेवाईकांच्या संतप्त भावना लक्षात घेत पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः उपस्थित राहून सर्वांना न्यायाची ग्वाही दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत घेण्यात आला असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या हत्येच्या प्रकरणाचा तपास आता IPS दर्जाचे अधिकारी तथा अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील करणार आहेत. संपूर्ण तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणताही दबाव न घेता केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासाचा भाग म्हणून मुख्य आरोपीची नार्को टेस्ट करण्यात येणार असून, सर्व संशयित आरोपींचे मोबाईल SDR, CDR, तसेच व्हॉट्सअॅप कॉल व डिजिटल डेटा तपासला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या या ठोस आश्वासनांमुळे काही प्रमाणात तणाव निवळला असला, तरी “सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशी ठाम भूमिका नातेवाईक व नागरिकांनी व्यक्त केली आहे. अकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या प्रकरणातील तपास आणि पुढील कारवाईकडे लागले आहे.