अकोट तालुक्यातील मोहाळा गावात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे अकोट तालुक्यात राजकीय व सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
भरदिवसा थेट हल्ला; आरोपीची ओळख स्पष्ट
मंगळवारी दुपारी साधारण दोनच्या सुमारास मोहाळा गावात ही घटना घडली. आरोपी उबेद खाँ उर्फ राजिक खाँ पटेल याने थेट हल्ला करून हिदायत पटेल यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने मदत करत पटेल यांना अकोट येथील धांडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अकोल्यात हलविल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार; अखेर प्राणज्योत मालवली
प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पटेल यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्ताने समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
५ जणांविरोधात गुन्हे; आणखी आरोपी वाढण्याची शक्यता
हिदायत पटेल हल्ला प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे, मुख्य हल्लेखोर उबेद पटेल यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आणखी एका संशयित आरोपीची भर पडण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिस तपास सुरू; तणावपूर्ण शांतता
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.