अकोट हादरलं!काँग्रेस नेते हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान निधन

Spread the love

अकोट तालुक्यातील मोहाळा गाव आज अक्षरशः हादरलं. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. दुपारी साधारण दोनच्या सुमारास आरोपी उबेद खाँ उर्फ राजिक खाँ पटेल याने थेट हल्ला करून पटेल यांना गंभीर जखमी केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या हिदायतउल्ला पटेल यांना तातडीने अकोट येथील धांडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि उपचार सुरू असतानाच पटेल यांनी प्राण सोडले. या घटनेने राजकीय वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

भरदिवसा हल्ला; परिसरात भीती

मोहाळा गावात दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात असून राजकीय नेत्यावरच असा जीवघेणा हल्ला होणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

पोलीस कारवाई; आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पंचनामा, फॉरेन्सिक पुरावे संकलन आणि साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राजकीय वातावरण तापले

हिदायतउल्ला खाँ पटेल यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात शोक व्यक्त करण्यात येत असून या हल्ल्यामागील कारणे, पार्श्वभूमी आणि कटाचा तपास सखोल व्हावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेने अकोट तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!