अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ बरकतउल्ला खाँ पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोट येथील धांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलीस कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला
आज दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मोहाळा गावात आरोपी उबेद खाँ कालू उर्फ राजिक खाँ पटेल (वय २२) याने हिदायत पटेल यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले तसेच ई-साक्ष नोंदवण्यात आल्या.
६ पथके, ४० अधिकारी; तासाभरात आरोपी अटकेत
आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तब्बल ६ स्वतंत्र पथके तयार केली. सुमारे ४० अधिकारी व अंमलदारांनी गुप्त माहिती व तांत्रिक साधनांच्या आधारे शोध मोहीम राबवली. अखेर रात्री सुमारे ८ वाजता आरोपीला ग्राम पणज, ता. अकोट येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. राजकीय नेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.