समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागून काही क्षणांतच बस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यात शिवणी पिसा गावाजवळ घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.
प्रवासादरम्यान बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आरडाओरड करत सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही मिनिटांतच बसने पूर्णपणे पेट घेतला आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रित करत पर्यायी मार्गाने वाहने वळवली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच महामार्गावर खासगी बसला लागलेल्या आगीत 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवासी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
