अकोल्यातून पोलीस दलाची मान खाली घालणारी, तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकानेच एका तरुणीची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अकोला–खामगाव (मुंबई–नागपूर) राष्ट्रीय महामार्गावर तरुणीचा पाठलाग करून, गाडी आडवी लावत अश्लील शब्दांत बोलणे व हातवारे केल्याचा आरोप आरोपी PSI वर करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव शंकर सुरेश बोंडे असून तो अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पीडित तरुणी (वय २७) ही तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असून बाळापूर नगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. ती रोज अकोल्याहून बाळापूरकडे राष्ट्रीय महामार्गाने ये-जा करते.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी काम आटोपून अकोल्याकडे परतत असताना आरोपी PSI ने तिचा पाठलाग केला. पुढे शेळद फाटा ते व्याळा रस्त्यावरील जिओ पेट्रोल पंपाजवळ तिची गाडी आडवी लावून अश्लील भाषेत बोलत हातवारे केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ डायल 112 वर कॉल केला.
माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणीला सुरक्षितरित्या बाळापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिच्या तक्रारीवरून आरोपी PSI शंकर बोंडे याच्याविरोधात BNS कलम 78, 79 आणि 126(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI माधुरी पाटील करीत आहेत.
या घटनेमुळे अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनत असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.