बुलढाणा जिल्ह्यातील वनविभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. बुलढाण्याच्या उपवनसंरक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक उपवनसंरक्षक अश्विनी आपेट आणि लिपिक अमोल मोरे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून वर्षभर कापलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सततच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबी पथकाने उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताच सहाय्यक उपवनसंरक्षक अश्विनी आपेट आणि लिपिक अमोल मोरे यांना एसीबीने रंगेहात पकडले. कारवाईनंतर कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील वनविभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय परवानग्यांसाठी नागरिकांना लाच द्यावी लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.









