नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा धडाका! दहिहांडा हद्दीत अवैध दारूवर मोठी कारवाई; १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नववर्षाच्या स्वागताआधीच दहिहांडा पोलिसांनी अवैध धंदेगारांवर धडक कारवाई करत परिसरात खळबळ उडवली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांनी दारू तस्करांचे मनसुबे उधळून लावले.

नवीन वर्षाच्या स्वागताआधीच दहिहांडा पोलीस ठाण्याने अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत दारू विक्रेत्यांना जोरदार धक्का दिला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणात देशी दारू व वाहने जप्त केली.

पहिल्या कारवाईत ग्राम जऊळका–दिनोडा रोड येथे आरोपी अनिल वसंता आंधळे (वय २८, रा. रोहणा, ता. अकोट) याच्या ताब्यातून २०० देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹१०,०००) आणि ॲक्टिव्हा ६जी (एमएच ३० बी-एक्स-४०३४, किंमत ₹५०,०००) असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत ग्राम जऊळका–रोहणखेड रोड येथे आरोपी अंबादास देविदास चेचरे (वय ३१, रा. चोहोट्टा बाजार, ता. अकोट) याच्या ताब्यातून २५० देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹१२,५००) आणि होंडा पॅशन प्रो मोटरसायकल (एमएच ३० वाय-९६४९, किंमत ₹४०,०००) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत एकूण ₹१,१२,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले (ठाणेदार, दहिहांडा) तसेच पोहेकॉ कमोद लांडगे, पो.कॉ. प्रमोद दळवी यांच्या पथकाने केली.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दहिहांडा पोलिसांची ही आक्रमक भूमिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरत असून, अवैध दारूविक्रीवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!