सत्तेच्या शिखरावर पोहोचताच जल्लोषाने मर्यादा ओलांडल्या का, असा थेट सवाल मलकापूरच्या राजकारणात उभा राहिला आहे. नूतन नगराध्यक्षांच्या विजयाच्या आनंदाला कायद्याची किनार लागली असून, एका व्हायरल व्हिडिओने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे.
मलकापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवत काँग्रेसचे अतिकभाई जवारीवाले शहराचे प्रथम नागरिक बनले आणि विदर्भाच्या प्रवेशद्वाराच्या राजकारणात एक नवे नाव चर्चेत आले. भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसूख संचेती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांना पराभूत करत अतिकभाईंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. मात्र, या विजयाच्या आनंदाला आता कायदेशीर गालबोट लागले आहे.
२१ डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होताच काँग्रेसकडून जोरदार विजय जल्लोष करण्यात आला. अध्यक्षीय लढतीत बाजी मारल्याच्या आनंदात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान अतिकभाई जवारीवाले हे बेभान झाल्याचे चित्र समोर आले. त्यांनी चक्क खिशातून नोटांचे बंडल काढून सार्वजनिक ठिकाणी नोटा उधळल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि मोठा वाद निर्माण झाला.
या व्हायरल व्हिडिओची दखल घेत तब्बल नऊ दिवसांनंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल बाळासाहेब भुसारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता लोखंडी रेल्वे पुलाजवळ पारपेठ परिसरात हा विजय उत्सव साजरा करण्यात आला होता. यादरम्यान नोटा उधळण्याचा प्रकार घडून नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.
नूतन नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने मलकापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, विजय उत्सवाच्या मर्यादा आणि आचारसंहितेची अंमलबजावणी किती कठोर आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.









