Ads

सर्वांचे धंदे बंद… पण ‘लाडक्या जावया’चा मटका जोमात! चोहोट्टा बाजारात पोलिस चौकीच्या पाठीमागे नेमका कुणाचा आशीर्वाद?

By Nilesh Sir

August 10, 2026 6:40 am

Ads

अकोट उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोहोट्टा बाजार परिसरात काही दिवसांपूर्वी ठाणेदारांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेक व्यवसाय बंद केल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्याच परिसरात पोलिस चौकीच्या पाठीमागे पिवळ्या ताडपत्रीखाली खुलेआम सुरू असलेला मटका व्यवसाय अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या पद्धतीने आठवडी बाजारात व्यापारी दुकान थाटून व्यवसाय करतात, त्याच पद्धतीने येथे मटका व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या उघडपणे सुरू असलेला हा अवैध व्यवसाय संबंधित यंत्रणेला दिसत नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी इतर वरली मटका धंद्यांवर बंदी घालण्यात आली. मग सर्वांसाठी एक नियम आणि एका ‘लाडक्या जावया’साठी दुसरा नियम असा प्रकार सुरू आहे का, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. जर हा व्यवसाय बेकायदेशीर असेल तर त्यावर तत्काळ कारवाई का होत नाही? आणि कायदेशीर असेल, तर त्याची अधिकृत परवानगी नेमकी कुणी दिली, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दहीहंडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आणि त्याहीपेक्षा पोलिस चौकीच्या अगदी पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला मटका व्यवसाय तेथे कार्यरत हेड कॉन्स्टेबल आणि कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटणे अवघड असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू आहे की कुणाच्या दबावामुळे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, अशी शंका व्यक्त होत आहे.

कायद्याचा धाक सामान्य नागरिकांसाठीच आहे का? अवैध व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरे आता दहीहंडा पोलिसांनी जनतेसमोर ठेवणे आवश्यक झाले आहे. कारण कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये अशा घटनांमुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेत वस्तुस्थिती तपासून दोषींवर कारवाई केली, तरच कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश जाईल. अन्यथा “सर्वांचे धंदे बंद… पण एका लाडक्या जावयाला खुलेआम मटका चालविण्याची मुभा” अशीच भावना जनमानसात अधिक बळावण्याची शक्यता आहे.

अवैध मटका हा केवळ जुगाराचा विषय नाही, तर अनेक कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्याशी निगडित गंभीर प्रश्न आहे. अशा व्यवसायामुळे युवक भरकटतात, गुन्हेगारीला खतपाणी मिळते आणि कायद्यावरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते.जर या व्यवसायाला कोणाचे संरक्षण असेल, तर ते उघड होणे आवश्यक आहे. आणि जर संरक्षण नसेल, तर तत्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणेही तितकेच गरजेचे आहे.

अन्यथा “एकाला नियम, दुसऱ्याला सूट” अशी भावना अधिक बळावेल.आता या प्रकरणात अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने स्वतः लक्ष घालून वस्तुस्थितीची चौकशी करावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांच्या मनातील संशय दूर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!