शेतात काम करताना जीवावर बेतले; रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा सोनोने या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना मदत केली.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेत एकलव्य आपत्कालीन पथकाचे पांडुरंग तायडे यांनी महत्त्वाची मदत करत जखमी महिलेला वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलालगतच्या भागात रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment