स्वीकृत नगरसेवकाच्या खुर्चीसाठी ‘चाटुगिरी’चे राजकारण उघडे;इच्छुकांची पक्षोपक्षी धावपळ

अकोला न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी अनुराग अभंग:-अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी काही इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून आखलेले राजकीय गणित सध्या पूर्णपणे कोलमडल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोणतीही निवडणूक न लढता थेट महानगरपालिकेत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षांनीच आरसा दाखवल्याने अनेकांचे राजकीय डाव उलटे पडले आहेत.


महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घाम गाळून पक्षाचे उमेदवार निवडून आणले. मात्र काही तथाकथित इच्छुकांनी कार्यकर्त्यांचा हक्क आणि काही ‘सोयीस्कर’ माध्यमांचा वापर करून स्वतःची राजकीय पिशवी भरल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. निवडणूक मैदानात उतरण्याची हिंमत नसताना स्वीकृत नगरसेवकाच्या दरवाज्यावर टकटक करून महानगरपालिकेत शिरकाव करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची आता चांगलीच पंचाईत झाली आहे.


राजकारणात वरवर निष्ठा दाखवणारे आणि पडद्यामागे वेगळेच डाव आखणारे काही चेहरे आता अकोल्यातील दिग्गज नेत्यांच्या दारात फेऱ्या मारताना दिसत असल्याची चर्चा आहे. कालपर्यंत स्वतःच्या पक्षात मोठमोठे दावे करणारे काही जण आता दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोन करून राजकीय आसरा शोधत असल्याची कुजबुजही राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.


स्वीकृत नगरसेवक पदाच्या आशेवर काहींनी कार्यकर्ते आणि काही माध्यमांना वापरून स्वतःचा ‘राजकीय बाजार’ उभा केला होता. मात्र पक्ष नेतृत्वाने वेळ येताच त्यांचा खरा स्तर समोर आणल्याने या इच्छुकांवर सळो की पळो अशी वेळ आल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, अकोला जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या राजीनामे, हकालपट्टी आणि ‘लेटर बॉम्ब’च्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकाच्या खुर्चीसाठी राजकारण करणाऱ्यांची आज नाही तर पुढच्या वेळी अश्या इच्छुकांची धावपळ अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment