महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पीककर्ज माफीची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या निर्णयानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना’ जाहीर
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटल्यानंतरही कर्जमाफीची घोषणा न झाल्याने विरोधकांकडून तसेच शेतकरी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना’ जाहीर करत कर्जमाफीचा निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा
सरकारने केवळ थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनाच नाही तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची घोषणा केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः पीकनुकसान, उत्पादन खर्च वाढ आणि बाजारभावातील चढउतार यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी महत्त्वाची ठरणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी संघटनांनीही या घोषणेचे स्वागत केले आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी कितपत वेगाने आणि प्रभावीपणे होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









