अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १३० किलो गोवंश मांसासह एकूण २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळेगाव बाजार येथील एक इसम गोवंशाची कत्तल करून मांस विक्री करीत आहे. ही माहिती मिळताच हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आरोपी नाने शेख नवाब शेख नजीर (वय ४३, रा. तळेगाव बाजार, ता. तेल्हारा, जि. अकोला) हा त्याच्या घरासमोरील अंगणात गोवंश मांस विक्री करताना आढळून आला. पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातून अंदाजे १३० किलो गोवंश मांस (किंमत अंदाजे २६,००० रुपये), एक लोखंडी कुऱ्हाड (४०० रुपये) आणि एक लोखंडी टोचा (३०० रुपये) असा एकूण २६,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १८३/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ), ९, ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ विनोद खर्डे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









