माना पोलिसांचा धडाकेबाज एक्शन; बकरी चोरी टोळीचा पर्दाफाश, ३ फरार आरोपी जेरबंद — वाहनांसह मुद्देमाल जप्त

अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या बकरी चोरी टोळीवर पोलिसांनी जोरदार कारवाई करत फरार असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील रात्रीच्या चोऱ्यांना मोठा लगाम बसला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३१७(२), ३(५) बीएलएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान गुर्जवाडा शिवारातून अज्ञात चोरट्यांनी बकऱ्यांची चोरी केली होती. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी काही बकऱ्या जप्त केल्या होत्या. मात्र उर्वरित आरोपी फरार होते. तपासाची सूत्रे घट्ट पकडत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रोहन ढोके, मोहन शिवरकर व मयूर ढोके यांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन (एमएच २७ एच ९४२२) तसेच दुचाकी (एमएच २७ एचजी ८३७२) जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करत चोरी साखळी उघडकीस आणली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे बकरी चोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला असून ग्रामीण भागात दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment