“पप्पांना फोन करा… ते पैसे देतील…”
हा शब्दांचा नव्हे, तर एका घाबरलेल्या लेकराचा जीव वाचवण्याचा आक्रोश होता. डोळ्यांत भीती, खांद्यावर दप्तर आणि समोर भरधाव वाहनांनी गजबजलेला हायवे… पण तरीही त्या निरागस विनवणीला माणुसकीचं उत्तर मिळालं नाही. एका निष्पाप चुकीची शिक्षा म्हणून एका चिमुकल्याला थेट महामार्गावर उतरवण्यात आलं, आणि समाज म्हणून आपण कुठे चुकतोय हा प्रश्न पुन्हा उभा राहिला.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून माणुसकी हादरवणारी घटना समोर आली आहे. शालेय पास चुकून घरी राहिल्याच्या कारणावरून सातवीत शिकणाऱ्या एका चिमुकल्याला एसटी बसमधून थेट भरधाव महामार्गावर उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “पप्पांना फोन करा, ते पैसे देतील,” अशी वारंवार विनंती करूनही वाहकाने दप्तरासह त्या निरागस मुलाला वाहनांच्या गर्दीत सोडल्याने पालकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रथमेश राहुल पाटील हा सातवीचा विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे तो मंगळवेढा आगाराची सोलापूर–मंगळवेढा (बस क्रमांक 9405) या एसटीने प्रवास करत होता. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर बस आल्यानंतर वाहकाने तिकीट तपासणी सुरू केली. यावेळी प्रथमेशने बॅगेत पास शोधला असता, तो चुकून घरी राहिल्याचे त्याच्या लक्षात आले.
घाबरलेल्या अवस्थेत प्रथमेशने वाहकाला वडिलांना फोन करण्याची विनंती केली. “पप्पा पैसे देतील,” असे तो सतत सांगत होता. मात्र त्या निरागस विनंतीकडे दुर्लक्ष करत वाहकाने कोणतीही सहानुभूती न दाखवता सायंकाळच्या वेळी बस थांबवून त्या चिमुकल्याला थेट महामार्गावर उतरवले.
अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. आजूबाजूला भरधाव वाहनं, मनात भीती आणि डोळ्यांत अश्रू… अखेर एका दुचाकीस्वाराने त्याला मदत केली आणि तो कसाबसा घरी पोहोचला. हा प्रकार ऐकून कुटुंबीय हादरून गेले.
या घटनेप्रकरणी पालक राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, जिल्हा आगार प्रमुख आणि तालुका आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून संबंधित वाहकावर तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. सरकार विद्यार्थ्यांना मोफत पास देते, पण एसटीतील माणुसकी कुठे हरवली? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.









