अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २६ मार्च : होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. 3 आरोपींकडून 2 तलवार आणि 1 कटारी जप्त करण्यात आली आहे. तसेच, एका तडीपार आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
या वर्षी पावेतो एकूण 49 अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर समाजशांतता भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस स्टेशन डाबकी रोड, पिंजर आणि उरळ यांच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात आली.
25 मार्च 2024 रोजी, पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे आरोपी दीपक नंदरधने (वय 40, रा. गोडपुरा, डाबकी रोड, अकोला) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. तर, पोलीस स्टेशन पिंजर हद्दीतील आरोपी गणेश कांबळे (वय 35, रा. जमकेश्वर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) याच्याकडून एक कटारी जप्त करण्यात आली.
तसेच, पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील तडीपार असलेला आरोपी रामा सुलतान (वय 24, रा. लोहारा, ता. बाळापुर, जि. अकोला) हा तडीपारीचे उल्लंघन करून अवैध शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असताना पकडण्यात आला. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यात मालमत्तेच्या आणि शरीराविरोधातच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी विशेष प्रसंगी नाकाबंदी, विशेष मोहिम, आकस्मिक सर्च मोहिम अशा प्रतिबंधक मोहिमेचे आयोजन करण्यात येते. 2024 मध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार एकूण 49 कारवाई करण्यात आल्या आहेत. तसेच, तडीपारांविरोधात कलम 142 मपोका प्रमाणे 5 कारवाई करण्यात आल्या आहेत. भविष्यातही गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी प्रतिबंधक कारवाईवर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.