WhatsApp

मालमत्ता कर वसुली खाजगीकरण प्रकरण निलेश देव थेट मुख्यमंत्री कार्यालयात करणार ठिय्या आंदोलन कर वसुलीतून अकोलेकरांची लूट होत असल्याचा आरोप

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ४ मार्च २०२४ :- अकोला- महानगरपालिकेने शहरातील मालमत्ता कर वसुलीचा कंत्राट खाजगी कंपनीला दिला. या खाजगीकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या कर वसुलीतून अकोलेकरांची लूट होत आहे. याबाबत संबंधित मंत्री व शासनाला वारंवार निवेदने दिली, तरीही दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश देव हे येत्या गुरुवार दि. 7 मार्च रोजी थेट मुख्यमंत्री कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहेत.

मालमत्ता कर किंवा महानगरपालिकेकडून लागू केला जाणारा इतर कोणताही कर वसूल करण्यासाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही. मग हा प्रकार अकोल्यातच का? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकारामधून अकोलेकरांची कशा पद्धतीने लूट होत आहे व हा खाजगीकरणातून कर वसुलीचा प्रकार कसा चुकीचा आहे, याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी महापालिका आयुक्तांसह राज्य सरकार व संबंधित मंत्र्यांना वारंवार पत्र देऊन अवगत केले.

मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर विकास विभागाचे मुख्य अप्पर सचिव या सर्वांना निवेदने देण्यात आली. परंतु या निवेदनांची दखल घेतल्या गेली नाही. परिणामी कर वसुलीच्या खाजगीकरणाच्या माध्यमातून अकोलेकरांची लूट होत आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून कर वसुली करतांना चुकीचे प्रकार घडत आहेत. नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी आहे. पण वारंवार निवेदने देऊनही दखल घेतल्या जात नसल्याने ॲड. धनश्री देव स्मृति सेवा प्रकल्प तथा निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी नेते निलेश देव यांनी आता या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री कार्यालयात ठिया आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवार दि. 7 मार्च रोजी ते मुख्यमंत्री कार्यालयात ठिया आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची माहिती म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.निलेश देव यांच्या या आंदोलनाच्या निर्णयाने संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष आता या आंदोलनाकडे लागले असून 7 मार्चला मुख्यमंत्री व राज्य सरकारमधील संबंधित मंत्री तथा अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

अकोलेकरांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- निलेश देव
संपूर्ण अकोलेकरांच्या हितासाठी महानगरपालिकेपासून ते मंत्रालय व मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने देऊन देखील अकोलेकरांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. अकोलेकरांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!