अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक २९ नोव्हेंबर संदीप सोळंके सह सागर खरात तेल्हारा :- शहरात शालेय विद्यार्थिनींवर छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून छेडछाड आणि धमकावण्याचे प्रकार सर्रास होत असून, या घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तेल्हारा शहरातील बसस्टँड, शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींवर छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. महाविद्यालयीन मुली रस्त्यावरून जात असताना गाडी चालवताना कट मारणे, इशारे करणे आणि धमकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रोडरोमिओ फक्त रस्त्यावरच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि बाहेरील टोळक्यांद्वारे मुलींशी मैत्रीच्या नावाखाली जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थिनींनी याला विरोध केला की त्यांना छेडछाड आणि बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत असून मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. या प्रकारांमुळे अनेक पालक आपल्या मुलींना शाळा-महाविद्यालयात पाठवण्याबाबत विचारमग्न झाले आहेत. तेल्हारा परिसरातील पालक आणि नागरिकांनी या गंभीर समस्येकडे जिल्हा पोलीस प्रशासन आणि दामिनी पथकाचे लक्ष वेधले आहे. तेल्हारामधील या घटनांवर तत्काळ कारवाई करत, रोडरोमिओंवर कडक पावले उचलली नाहीत तर मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पालकांनी प्रशासनाकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.