अकोला न्युज नेटवर्क स्वप्निल सुरवाडे प्रतिनिधी पातूर :- (फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट) रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ऐका खाजगी वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर असलेला ” संविधान दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? तुमच्या मुलांना नक्की सांगा.” अशा आशयाच्या लेखावर एका इसमाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने या पोस्ट विरोधात भीम जयंती सार्वजनिक उत्सव समिती पातुर द्वारा पातुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीवरून बुधवार 29 नोव्हेंबर रोजी पातुर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. फेसबुकवर खाजगी वृत्तवाहिनीने संविधान दिनाबाबत माहितीपूर्ण लेख प्रकाशित केला. या लेखावर एका इसमाने आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केली. या पोस्टमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत भीम जयंती सार्वजनिक उत्सव समिती व नागरिकांनी पातुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
संबंधित इसमाने भावना दुखावण्याचा व तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या असल्याने संबंधित ईसमावर तातडीने योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. या तक्रारीवर पातूर पोलिसांनी किरण रामदास राखोंडे रा.पातूर याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० कलम २९५- A, माहिती तंत्रज्ञान अधिनियम,२००६ कलम ६६(फ), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ कलम ३(१) (पाच) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी संबंधित युवकाला अटक करण्यात आली असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपले कर्तव्य चोखपणे बाजावल्यामुळे भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती पातूरच्या वतीने ठाणेदार किशोर शेळके यांचा राजर्षी शाहू महाराजांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.