WhatsApp

Model Code Of Conduct आचारसंहिता म्हणजे काय? ती नेमकी कधी लागू होते? वाचा A to Z माहिती

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १५ मार्च :- Model Code Of Conduct कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सर्वात पहिला शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. देशामध्ये लोकशाहीचा गाभा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होणं आवश्यत असतं. त्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) नावाची एक वेगळी यंत्रणा कामाला लागलेली असते. निवडणूक आयोगाकडून मुक्त निवडणुका व्हाव्यात, निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांचं मत दिसावं यासाठी काही नियम केलेले असतात.

एकदा का निवडणूक जाहीर झाली की हे नियम म्हणजे आदर्श आचारसंहिता लागू होते. ही आचारसंहिता सर्व पक्षांना आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना लागू असते. या नियमांचे पालन करणं बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते. आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि ते सर्व नियम हे संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात. निवडणूक आचारसंहिता निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत सुरू राहते.

निवडणुकीच्या आचारसंहितेबद्दल अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडताना दिसत असतात. आचारसंहिता म्हणजे नेमकी काय, त्याचे नियम काय, त्याचे उल्लंखन केल्यास काय कारवाई होते अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देणयाचा प्रयत्न करत आहोत.

  1. आचारसंहिता कधीपासून लागू होते?

निवडणूक आयोगाकडून कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली जाते. त्यावेळी तारखा जाहीर करताच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती कायम राहते.

  1. कोणत्या भागात आचारसंहिता लागू केली जाते?

लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केली जाते. तर लोकसभेच्या किंवा विधासभेच्या एखाद्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित मतदारसंघाच्या परिसरातच लागू केली जाते.

  1. पहिली आचारसंहिता कुठे लागू केली गेली?

देशात पहिली आचारसंहिता ही 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आली. तर 1962 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सर्व देशभरात त्यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणत्या गोष्टींचे पालन करावे लागेल याची नियमावली होती.

  1. आचारसंहिता कोणत्या कायद्यान्वये लागू केली जाते?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेला कोणत्याही कायद्याचा आधार नाही. ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. तसेच त्यामध्ये वेळोवेळी बदलही केले जातात.

  1. आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती?

आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा, मिरवणुकांचे नियोजन कसं करावं, त्यासाठी काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहितेत नमूद असतो. तसेच मतदान दिवसाचे कामकाज आणि कामकाजादरम्यान कशा पद्धतीने वागावं आणि कशा पद्धतीने वागू नये याचीही नियमावली नमूद केलेली असते.

  1. पक्ष आणि उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही पक्ष किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल, किंवा त्याच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जाती आणि समूदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये.

  1. निवडणूक प्रचारासाठी धर्माच्या आधारे मत मागता येतात का? धार्मिक स्थळांचा वापर करता येतो का?

निवडणूक प्रचार आणि धार्मिक स्थळे यांच्याविषयी आचारसंहितेमध्ये विस्तृत नियमावली आहे. उमेदवार किंवा पक्षाला कोणतीही मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर करता येणार नाही. कोणताही राजकीय पक्ष जात किंवा धर्माच्या आधारावर मते मागू शकत नाही किंवा अशा कृतीत सहभागी होणार नाही. त्याचसोबत मते मिळवण्यासाठी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करता येणार नाहीत.

  1. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार करता येतो का?

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मतांसाठी प्रचार करण्यास मनाई आहे. त्याचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते.

  1. मंत्री शासकीय मनुष्यबळ, बंगला वापरू शकतात का?

एकदा निवडणुका जाहीर झाल्या की आचारसंहितेनुसार कोणत्याही सरकारला किंवा मंत्र्याला सरकारी योजना जाहीर करता येत नाहीत. तसेच कोणत्याही विकासकामाचं उद्धघाटन करता येत नाही. सरकारच्या निधीतून होणाऱ्या कोणत्याही विकासकामाची पायाभरणी किंवा भूमिपूजनही करता येत नाही.

  1. शासकीय अधिकाऱ्याची बदली किंवा बढती होऊ शकते का?

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अधिकाऱ्याची बदली किंवा बढती आवश्यक वाटल्यास आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

  1. निवडणूक रॅली, मिरवणूक काढायची असल्यास काय?

कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक रॅली किंवा मिरवणूक काढायची असल्यास प्रथम पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या परिसरात किंवा भिंतीवर त्याच्या परवानगीशिवाय कोणतेही पोस्टर, बॅनर किंवा झेंडा लावता येणार नाही.

  1. मतदारांना आणण्यासाठी पक्ष आणि उमेदवार वाहनांचा वापर करू शकतात का?

मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्या वाहनांचा वापर करू शकत नाहीत. तसेच राजकीय पक्ष कोणत्याही मतदाराला त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकावू शकत नाहीत.

  1. निवडणुकीच्या काळात पैसे, दारू वाटप करता येऊ शकतं का?

मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद ठेवली जातात. निवडणुकीच्या काळात दारू आणि पैसे वाटण्यासही बंदी आहे.

  1. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते?

कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने आदर्श आचारसंहिता पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकतं. आवश्यक असल्यास फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!