अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो दिनांक १ एप्रिल :- Lok Sabha Election 2024 वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. अभय पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच डॉ. पाटील यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती.
काँग्रेसच्या गटातून डॉ. पाटील यांच्या नावाला मोठा विरोध होता. डॉ. पाटील अलीकडेच पक्षात दाखल झाले असून त्यांचे पक्षकार्यासाठी कोणतेही योगदान नाही, असे काँग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे होते. पाटलांना होणाऱ्या विरोधातूनच काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत वाद झाले होते. त्यावरुन डॉ. पाटील यांनी आपले पिस्तुल काढल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. अशातच काँग्रेसने हा सर्व स्थानिक विरोध दुर्लक्षित करून डॉ. अभय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरविले आहे. डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात ही लढत होणार आहे. काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीला झुलवत ठेवल्याने ‘वंचित’ला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमदेवारांना स्वतः पाठिंबा जाहीर केला आहे. अशात डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असली तरी अखेरच्या क्षणापर्यंत अकोल्यात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे एकत्रीकरण व्हावे, यासाठी पडद्याआड प्रयत्न सुरू आहेत.
उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या क्षणापर्यंत अनेकांना आताही काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे एकत्रीकरण असा विश्वास आहे. डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी मिळताच अकोल्यातील भाजपच्या गोटात काहीसा आनंद व्यक्त होत आहे. मतांचे गणित पाहता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस यांच्या तह न झाल्यास अकोल्याच्या गडावर यंदाही भाजपचा झेंडा फडकेल यात शंकाच नाही.