अकोला न्युज नेटवर्क दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ :- सराफा बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठा दिलासा दिला होता. पण या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. एक दिवस भाव वाढतो तर दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण पाहायला मिळते. जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. एक दिवसाआड किंमतीत फरक दिसत असल्याने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना कडू-गोड अनुभव येत आहे. दोन्ही धातूच्या किंमतीत घसरण झाली आहे. आता अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 23 February 2024)
सोन्याचा भाव उतरला
गेल्या आठवड्यात सोन्यात स्वस्ताईचे सत्र होते. तर या आठवड्यात सोन्यात चढउतार दिसून आला. 16 फेब्रुवारीला 200 तर 17 फेब्रुवारीला 100 रुपयांची वाढ झाली. 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाला. 21 फेब्रुवारी रोजी सोने 250 रुपयांनी महागले. तर 22 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत आपटी बार
चांदीत या महिन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे 1100 आणि 900 रुपयांनी चांदी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. तर आता 22 फेब्रुवारी रोजी चांदीत 700 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,155 रुपये, 23 कॅरेट 61,906 रुपये, 22 कॅरेट सोने 56,934 रुपये झाले. 18 कॅरेट 46,616 रुपये, 14 कॅरेट सोने 36,361 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,396 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.