WhatsApp


लोकसभेच्या तोंडावर गौतमचा मोठा निर्णय मोदी शहांचे आभार मानत दिली महत्त्वाची अपडेट

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २ मार्च २०२४ :- लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिला आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षा लवकरच उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करेल. त्यात कोणाकोणाची नावं असणार याची उत्कंठा लागून राहिलेली असताना भाजप खासदार गौतम गंभीरनं मोठा निर्णय घेतला. राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेत गंभीरनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भाजप खासदार गौतम गंभीरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘माननीय पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला माझ्या राजकीय कर्तव्यांमधून मुक्त करावं. त्यामुळे मला क्रिकेटशी संबंधित कामांकडे लक्ष केंद्रित करता येईल. मला जनसेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहांचे मनपूर्वक आभार, जय हिंद,’ असं गंभीरनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गौतम गंभीर सध्याच्या घडीला पूर्व दिल्लीचा खासदार आहेत. २०१९ मध्ये गंभीरनं या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंदर सिंग लवली यांचा जवळपास ४ लाख मतांनी पराभव केला होता. मात्र आता आपण पुढील टर्मसाठी इच्छुक नसल्याचं गंभीरनं म्हटलं आहे. २००७ मध्ये भारतानं पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. २०११ मध्ये भारतानं एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला. दोन्ही स्पर्धांच्या विजेतेपदात गंभीरचं योगदान महत्त्वाचं होतं. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्यानं चमकदार कामगिरी केली. त्याच्या फलंदाजीमुळेच भारतीय संघाचा विजय शक्य झाला.२००७ च्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध गंभीरनं ५४ चेंडूंमध्ये ७५ धावा कुटल्या. भारतीय संघानं केलेल्या धावांपैकी जवळपास निम्म्या धावा एकट्या गंभीरनं केल्या होत्या. २०११ मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये त्यानं ९१ धावांची शानदार खेळी साकारली. गंभीर आयपीएलमध्ये सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आहे. त्याआधी तो लखनऊ सुपर जाएंट्सचा मेंटर राहिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!